थोडक्यात बातम्या – बोरिवलीत रंगणार ‘स्वर आशा’

‘अनुबोध’ आणि ‘नवचैतन्य प्रतिष्ठान’ यांच्या वतीने बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाटय़ मंदिरात 23 ऑक्टोबर रोजी पहाटे 6.30 वाजता ‘स्वर आशा’ या दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांनी गायलेल्या गीतांचा सुरेल नजराणा गायिका धनश्री देशपांडे, मधुरा कुंभार, केतकी चैतन्य व सहगायक शार्दुल कवठेकर या कार्यक्रमात सादर करतील. संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे असून निवेदन अभिनेते विघ्नेश जोशी करतील. रसिकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक भूषण पाटील यांनी केले आहे.

मामा राजवाडेविरुद्ध आणखी एक गुन्हा

विसे मळा गोळीबार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजपाच्या मामा राजवाडे व टोळीविरुद्ध शनिवारी आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल केला. रविवारी पाचजणांना अटक झाली. न्यायालयाने त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. मालेगाव स्टॅण्ड येथील न्यू पंजाब रेस्टॉरंट अॅण्ड बारच्या महिला मालकाकडे 19 फेब्रुवारी रोजी मामा राजवाडे व टोळीने 50 हजारांची खंडणी मागितली. नकार दिल्याने बार बंद करण्याची धमकी दिली, विनयभंग केला. 25 फेब्रुवारीला व्यवस्थापकाला रॉड, कोयत्याने जबर मारहाण केली. मामा राजवाडे व त्याच्या साथीदारांवर दुसऱया प्रकरणात कारवाई झाल्याने शनिवारी संबंधित महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार मामा राजवाडे, बाबासाहेब बढे, योगेश पवार, प्रकाश गवळी, विशाल देशमुख, संदीप पवार, लखन पवार, शरद पवार, प्रवीण कुमावत, धीरज शर्मा, राहुल बागमार उर्फ राहुल जैन, चैतन्य कावरे व अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रविवारी कुमावत, बढे, जैन, गवळी व योगेश पवार यांना अटक केली.