एक्सप्रेसमध्ये पुढील स्थानकाची घोषणा होणार, हायकोर्टाचे रेल्वेला महत्त्वपूर्ण आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘वंदे भारत’प्रमाणे सर्व एक्सप्रेस गाडय़ांमध्ये पुढील स्थानकाची घोषणा करणारे तंत्र विकसित करा, असे आदेश उच्च न्यायालयाने रेल्वेला दिले.

एका प्रवाशाने चुकून एक एक्सप्रेस पकडली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याने उतरण्याचा प्रयत्न केला व तो ट्रेनमधून पडला. यात त्याच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली. याच्या भरपाईसाठी त्याने अर्ज केला. रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरणाने तो फेटाळला. याविरोधात या प्रवाशाने याचिका दाखल केली होती. न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने ही याचिका मंजूर केली. कोणताही प्रवासी स्वतःचा जीव धोक्यात टाकून धावत्या ट्रेनमधून उतरणार नाही. अशा परिस्थितीत प्रवाशाच्या मानसिकतेचा विचार व्हायला हवा, असे नमूद करत न्यायालयाने या प्रवाशाला 80 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश रेल्वेला दिले.