मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहितसह 7 जणांची पुराव्यांअभावी सुटका

2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, असे म्हणत विशेष एनआयए न्यायालयाने भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जणांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. विशेष एनआयए न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या घटनेत 6 ठार तर 100 हून अधिक जण जखमी झाले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए), आयपीसीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या 17 वर्षापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. आता या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने आज सुनावला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

विशेष एनआयए न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण –

  • बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध, पण दुचाकीमध्येच स्फोट झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश
  • बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणाचा पंचनामा योग्य नव्हता. घटनास्थळावरून हातांचे ठसे, वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत.
  • साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दुचाकीच्या मालक होत्या हे स्पष्ट झालेले नाही.
  • दहशतवादाला कोणताही धर्म नसोत, पण नैतिकतेच्या आधारावर शिक्षा दिली जाऊ शकत नाही.
  • आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचे सिद्ध होऊ शकलेले नाही.
  • कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी वापरला जाणारा बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजे यूएपीए कायदा लागू होत नाही.