बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा नवरा निक जोनस सध्या चाहत्यांच्या मनमानीला कंटाळला आहे. नुकताच जोनस ब्रदर्सचा शो प्रागमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी एक धक्कादायक घटना घडली. लाइव्ह परफॉर्म करत असताना एका चाहत्याने लेझर लाइटच्या माध्यमातून निक जोनसला लक्ष्य केले. चाहत्याने असे करणे निकला अजिबात आवडले नाही. निकने त्याच्याबरोबर असलेल्या सुरक्षारक्षकांना इशारा करून स्टेजवरून खाली उतरून बाहेरच्या दिशेने धाव घेतली. निकने तत्काळ कॉन्सर्टमधून काढता पाय घेत कॉन्सर्ट अर्ध्यावर सोडून दिले. या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये निकवर लेझर लाइटने कसा निशाणा साधला गेला हे देखील स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. लेझर लाइट मारणाऱ्या तरुणाला कॉन्सर्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. काही वेळाने कॉन्सर्टला पुन्हा एकदा सुरुवात झाली. निकला भर कॉन्सर्टमधून अशाप्रकारे बाहेर पडावे लागल्याने त्याच्या चाहत्यांनी गायकाच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.