नाईट ब्लॉकमुळे सोमवारपासून मध्य रेल्वेच्या आठ लोकल रद्द

मध्य रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी कामासाठी सोमवार 27 फेब्रुवारीपासून नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील चार लोकल गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत, तर डाऊन मार्गावरील चार लोकल गाडय़ा पुढील सूचना मिळेपर्यंत शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. त्यामुळे रात्री उशीरा घरी जाणाऱया प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून डाऊन मार्गावर रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी सुटणारी कुर्ला लोकल, 12.28 वाजता सुटणारी ठाणे लोकल, 12.31 वाजता सुटणारी कुर्ला लोकल आणि दादर येथून 12.29 वाजता सुटणारी ठाणे लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

अप उपनगरीय मार्गावरील आसनगाव येथून 22.10 वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल ठाण्यापर्यंत चालविण्यात येईल, अंबरनाथ येथून 22.15 वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी गाडी कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येणार आहे. कल्याण येथून 22.56 वाजता सीएसएमटीसाठी  सुटणारी गाडी कुर्ल्यापर्यंत चालविण्यात येईल. तसेच कल्याण येथून 23.11 वाजता सुटणारी गाडी दादरपर्यंत चालवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.