नाईट लाईफबाबत अपप्रचार सुरू आहे- अनिल परब

905
anil-parab

नाईट लाईफबाबत अपप्रचार सुरू आहे. शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची नाईट लाईफची संकल्पना वेगळी आहे. असे मत रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी सोमवारी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना मांडले.

जिल्हा नियोजनच्या बैठकीसाठी पालकमंत्री अनिल परब सोमवारी रत्नागिरीत आले होते. बैठकीपूर्वी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. मुंबईची जीवनशैली वेगळी आहे. रात्रीच्यावेळी मुंबईत येणाऱ्या व्यक्तीला जेवण मिळाले पाहिजे. मुंबईत दिवसभर लोक काम करत असतात. अशावेळी रात्रीच्या वेळी त्यांना खरेदीसाठी, मॉलमध्ये जाण्यासाठी नाईट लाईफ आहे. काही कारखाने रात्रीच्या वेळी सुरू असतात तेथील कामगारांसाठी हे नाईट लाईफ आहे असे मत अॅड. अनिल परब यांनी यावेळी मांडले.

काही दिवसापूर्वीच जिल्हा नियोजनची एक बैठक मुंबईत झाली. जिल्हा नियोजनाच्या बैठकीत सर्वांगीण विकासासाठी सर्व निधीचे योग्य नियोजन करून सर्व निधी खर्च करण्यावर आमचा भर असेल असा आश्वासन त्यांनी दिले. मुंबईतील बैठकीला काही अधिकारी गैरहजर होते, त्यांना नोटीसा पाठवून खुलासा मागविण्यात आला आहे. तिवरे धरणफुटीतील दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मुंबईतील बैठकीत चर्चा झाली होती. सोमवारच्या बैठकीत त्यावर ठोस निर्णय होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जि.प.अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, योगेश कदम, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या