निलंगा – नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निलंगा तालुक्यातील जामगा येथील शेतकरी बालाजी रविंद्र बिरादार (45) या शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून सोमवारी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

बिरादार यांनी आपल्या तिन एकर शेतात खरीप पिकाची पेरणी केली होती. सततच्या पावसामुळे व गोगलगायींच्या प्रादुर्भाव होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले दुबार पेरणी करण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली होती. त्यांनी दुबार पेरणीसाठी बाजारातून बियाणे खरेदी करून आणून ठेवले होते.

पण सततच्या पावसामुळे पेरणी करण्यासही उसणे मिळत नव्हते. यातच संसाराचा गाडा कसा हाकलावा या चिंतेने त्यांनी सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या प्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गिते हे करीत आहेत. त्यांच्यावर हलगरा येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.