नीलेश कुलकर्णी यांना ‘मराठवाडा पत्रकारिता रत्न’ पुरस्कार

‘मराठवाडा सेवक प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणारा मराठवाडा पत्रकारिता रत्न पुरस्कार दै. ‘सामना’ चे दिल्ली ब्युरो चीफ नीलेश कुलकर्णी यांना एका समारंभात यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात प्रदान करण्यात आला. मराठवाडय़ातील नागरिकांनी एकत्र येऊन पुण्यामध्ये मराठवाडा सेवक प्रतिष्ठानची स्थापना केली असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सागर देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नीलेश कुलकर्णी यांना मराठवाडा पत्रकारिता रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे भाऊसाहेब जाधव, संत एकनाथ महाराज यांचे चौदावे वंशज योगीराज वेणीमाधव गोसावी, लिज्जत पापडचे सुरेश कोते, प्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर आदी उपस्थित होते. यावेळी शोभा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘गे माय भू तुझे मी’ या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाने या कौतुक सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली.