
के. के. रेंजसाठी पारनेर, नगर व राहुरी तालुक्यांतील जमिनींचे हस्तांतर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 मे 2017 मध्ये मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली होती, असा गौप्यस्फौट आमदार नीलेश लंके यांनी केला. दरम्यान, फडणवीस सरकारच्या पापाचे खापर आमच्या सरकारच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. मात्र, शरद पवार यांनी तो डाव उधळवून लावल्याचेही लंके म्हणाले.
के. के. रेंजच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याबद्दल वनकुटे येथे आमदार नीलेश लंके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.आमदार लंके म्हणाले, के. के. रेंजला जमिनी देण्याचा निर्णय झाल्यानंतर नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय जमिनींचे मूल्यांकनही केले होते. ही जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आग्रह धरून सरंक्षणमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणली. या बैठकीत पवार यांनी या भागातील आदिवासी, तसेच विकसित झालेल्या शेतीसंदर्भात माहिती दिल्यानंतर संरक्षणमंत्री, लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख तसेच इतर अधिकाऱयांनी के. के. रेंजसाठी अधिग्रहण होणार नाही, याची खात्री दिली.
के. के. रेंजचं मानगुटीवर बसलेलं भूत कायमचे काढून टाकणार आहोत. के. के. रेंजला जमिनी देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र, आता शेतकऱयांची जाणीव असणारे सरकार आल्याने तसेच शरद पवार यांना शेतकऱयांचे दुःख माहीत असल्यामुळे या संकटावर आपण मात करू शकतो. फडणवीस सरकारचे पाप आमच्या सरकारच्या डोक्यावर फोडण्याचे काम सुरू झाले होते. ते आम्ही परतवून लावल्याचे आमदार लंके म्हणाले.



























































