पवन राजेनिंबाळकर खुन प्रकरण; आरोपी जैनचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तत्कालीन काँग्रेसचे नेते तथा खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी यांच्या दुहेरी हत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपी पारसमल जैन याचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे आता न्यायालयासमोर याप्रकरणी अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तत्कालीन काँग्रेसचे नेते तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर हे मुंबईहून धाराशिवकडे येत असताना कळंबोली येथे त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर समद काझी याची ही गोळी घालून हत्या करण्यात आली होती. हे दुहेरी हत्या प्रकरण राज्यभरात गाजले होते. या प्रकरणी सध्या सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 4 पारसमल जैन यांनी 4 डिसेंबर 2019 रोजी न्यायालयाकडे माफीचा साक्षीदार करण्याबाबत अर्ज दिला होता. त्यावर न्यायालयात दोन्ही बाजूची सुनावणी होऊन न्यायालयाने 21 डिसेंबर 2019 रोजी आरोपी पारसमल जैन याला माफीचा साक्षीदार करण्याचा अर्ज मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दुहेरी खून प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे.

आरोपी पारसमल जैन याचा माफीचा साक्षीदार होण्याबाबतचा अर्ज सत्यघटना सांगण्याच्या अटीवर न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे मागील 13 वर्षापासून न्यायालयात सुरू असलेल्या दुहेरी खून खटल्याच्या बाबत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. हत्येचा रचलेला कट तसेच प्रत्यक्षात यावेळी सहभागी असणारे शूटर, त्यांनी वापरलेली शस्त्रे, आरोपींनी वापरलेले वाहन, हत्ये मागचा हेतू इत्यादी घटनाक्रम पुन्हा एकदा न्यायालयासमोर येण्याची शक्यता आहे.