9 रंगात रंगलेली देवीची 9 रूपे..

 

देवीआईचा उत्सव हा चैतन्याने.. उर्जेने भरलेला असतो. स्वत: देवीतत्व ऐश्वर्यसंपन्न रुपात खाली उतरते. म्हणूनच नवरात्रीचे नऊ रंग आहेत. जे ऐश्वर्य.. सुबत्ता.. उर्जा.. आणि उत्साहाचे प्रतिक आहे. देवीच्या प्रत्येक रूपाचा प्रत्येक रंग प्रतिक आहे.

  • शैलपुत्री – नवरात्रीचा पहिला दिवस तिच्या शैलपुत्री  रूपाचा. शैलपुत्री  म्हणजे पर्वतकन्या. या रुपात ती निसर्गमातेच्या परिपूर्ण रुपात शक्तीचे प्रतिक असते. पिवळा रंग म्हणजे ओजस्विता, आनंद आणि उत्साह.
  • ब्रम्ह्चारिणी – देवीचे दुसरे रूप ब्रम्ह्चारिणी होय. या रुपात ती अध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात असलेली स्त्री आहे. या रुपात ती तपस्या करण्यासाठी हिरव्याकंच पर्वतावर जाते. येथेच तिचा भावी पती शिव आहे. येथे ती त्याच्याबरोबर समरूप होते.. म्हणूनच तिच्या रूपाचा हिरवा रंग विकास, निसर्ग आणि उर्जा यांचे प्रतिक आहे.
  • चंद्रघंटा – हे देवीचे तिसरे रूप. या रुपात तिच्या मस्तकी राखाडी रंगाची चंद्रकोर आहे. राखाडी रंग हा तिच्या भक्तांसाठी शत्रूचा नाश करण्यासाठी सदैव तत्परतेचे प्रतिक आहे.
  • कुष्मांडा – हे देवीचे चौथे रूप. या रुपात देवी तिच्या मनमोहक हास्याने, तिच्या देदीप्यमान रूपाने आणि तेजाने सूर्याला प्रकाशमान करते. ती इतकी शक्तिशाली आहे की सूर्यावर निवास करू शकते. म्हणूनच हा नारिंगी रंग तिच्या आंनद आणि उर्जेचा सूचक आहे.
  • स्कंदमाता – या रुपात ती कार्तिकेयाची माता आहे. तिच्या माडीवर कार्तिकेय आहे. तिचा हा शांत, प्रेमळ अवतार आईच्या प्रेमळ रूपाचे द्योतक आहे. म्हणूनच येथे रंग पांढरा आहे
  • कात्यायनी – हे तिचे सहावे रूप आहे. येथे ती देवांच्या क्रोधातून उत्पन्न झाली आहे. म्हणूनच ती अतिशय उग्र रुपात आहे. त्यामुळे लाल रंग तिला उर्जा, तेजस्विता प्रदान करतो.
  • कालरात्री- हे तिचे सातवे रूप आहे. या रुपात ती शत्रूंचा विनाश करते. येथे तिचे काली स्वरूप दिसते. ही तिची शक्तिशाली उर्जा निळ्या रंगात प्रगटली आहे.
  • महागौरी – तिचे आठवे रूप सारे मनोरथ पुरविते. गुलाबी रंग आशा, निरागसता याचे प्रतिक आहे.
  • सिद्धीदात्री – नवव्या रुपात ती ज्ञानाची दात्री आहे. ती भक्तांवर सतत प्रसन्न आणि वरदायिनी आहे. म्हणूनच हा जांभळा रंग सकारात्मकता, महत्वाकांक्षा आणि शक्तीचे प्रतिक आहे.