‘समुद्र महल’मधील जप्त मालमत्तेचा लिलाव थांबवा! निरव मोदीच्या मुलाची हायकोर्टात याचिका

nirav-modi-new

पंजाब नॅशनल बँकेला कोटय़वधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा मुलगा रोहिन मोदी याने हायकोर्टात धाव घेतली आहे. अंमलबजावणी संचनालयाने मोदीचा वरळी येथील समुद्र महालमधील फ्लॅट जप्त केला असून त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्थावर मालमत्ता रोहिन ट्रस्टची असल्याने लिलाव थांबविण्यात यावा अशी मागणी रोहिन याने केली आहे.

समुद्र महाल येथील फ्लॅट 2006 साली खरेदी करण्यात आला असून हा फ्लॅट ट्रस्टच्या मालकीचा आहे. त्यामुळे निरव मोदीचा त्यावर अधिकार नाही म्हणून ईडीने या फ्लॅटच्या लिलावाची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी करत रोहिन याने ऍड. अभिमन्यू भंडारी आणि ऍड. लक्षवेध ओढेकर यांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी याचिकेला जोरदार विरोध करत कोर्टाला सांगितले की सदर फ्लॅट हा निरव मोदी व पत्नी अमी हिच्या मालकीचा आहे. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत याचिकाकर्त्याना सत्र न्यायालयाने जप्त मालमत्तेबाबत दिलेल्या आदेशाची प्रत सादर करण्यास सांगितले व सुनावणी 13 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या