
निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची तारीख भलेही निश्चित झालेली नाही, पण तिहार तुरुंग प्रशासनाने मात्र त्याची पूर्ण तयारी केली आहे. चारही दोषींना एकत्र फाशीवर चढवण्यासाठी तिहार तुरुंगात जवळपास 25 लाख रुपये खर्च करून एक नवीन फाशीघर तयार करण्यात आले आहे. आता एकाच वेळी चारही गुन्हेगारांना फाशी देण्याची व्यवस्था झाली असल्याचे तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनीदेखील सांगितले. पतियाळा हाऊस कोर्टात उद्याच्या सुनावणीत चौघांच्या फाशीची तारीख निश्चित होऊ शकते.
एकीकडे तुरुंग अधिकारी निर्भयाच्या अत्याचाऱ्यांना फाशी देण्याची तयारी करीत असताना, हे गुन्हेगार तुरुंगात नवीन गुन्हा करण्याचा कट रचत आहेत, अशी माहिती काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. नवा गुन्हा दाखल झाला की फाशीच्या शिक्षा पुढे ढकलली जाईल, असा त्यांचा हेतू आहे. तिहारच्या जेल क्रमांक 2 मध्ये अक्षय, मुकेश आणि पवन यांच्या या कटाची कुणकुण तुरुंग प्रशासनाला लागली. त्यानंतर तिघा गुन्हेगारांना हाय सिक्युरिटी सेलमध्ये हलवण्याची परवानगी तुरुंग प्रमुखांकडे मागण्यात आली आहे.
दोन-दोन जल्लादांची गरज
चारही दोषींना एकाच वेळी फाशी देण्यासाठी चार जल्लादांची गरज भासू शकते. दोन्ही फाशीघरांचा ‘लिव्हर’ वेगवेगळा असेल. अधिकाऱयांना चारही जणांना फाशी देताना पाहता येईल, अशी क्यकस्था यात आहे.
चौघांच्या फाशीची तारीख निश्चित करण्यासाठी 7 जानेवारी रोजी पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी आहे. दोषी अजूनही सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करू शकतात.






















































