‘निर्भया’ बलात्कार प्रकरण, फाशीपासून वाचण्यासाठी दोषींची अखेरची धडपड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील दोषी फाशीपासून वाचण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहत आहेत. आता क्युरेटिव्ह आणि दया याचिका दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून याबाबत तिहार तुरुंग प्रशासनाने नोटिसीद्वारे दोषींना विचारणा केली होती.

कायद्यानुसार आपल्याकडे आणखी काही पर्याय असल्याचे या दोषींनी म्हटले आहे. आता क्युरेटिव्ह आणि दया याचिकेचा वापर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील चारही दोषी पवन, विनय, मुकेश आणि अक्षय यांनी दाखल केलेली फेरविचार याचिका यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दरम्यान, क्युरेटिव्ह याचिकेनंतर दया याचिका दाखल करण्याची राज्यघटनेत तरतूद आहे. दया याचिकाही फेटाळण्यात आली तर त्यांच्या नावाने डेथ वॉरंट जारी करण्यात येते. त्यानंतर त्यांची शेवटची इच्छा काय आहे ते विचारण्यात येते.

काय आहे क्युरेटिव्ह याचिका

दोषी न्यायालयाच्या निर्णयातील तांत्रिक बाबींवर बोट ठेवून न्यायालयाला प्रश्न करू शकतो, परंतु त्यासाठी ज्येष्ठ वकिलाच्या शिफारसीची गरज असते. बलात्कार प्रकरणात आतापर्यंत कुठल्याही दोषीने क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली नाही. या याचिकेवरील सुनावणी एखाद्या चेंबरमध्ये होते किंवा तीन न्यायाधीशांच्या उपस्थितीत होते. रिव्यू आणि क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यानतंर दया याचिका दाखल करण्याची तरतूद आहे. ही याचिकाही फेटाळली तर दोषींच्या नावे डेथ वॉरंट जारी करण्यात येते आणि त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात येते.