‘रेड’ अलर्ट! इतिहासातील सर्वात मोठे निसर्ग चक्रीवादळ आज मुंबईवर धडकणार

2514

इतिहासातील सर्वात मोठे निसर्ग चक्रीवादळ उद्या मुंबई, महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनारपट्टीला सर्वाधिक असल्यामुळे हवामान खात्याकडून आपत्कालीन विभागाला ‘रेड’ अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत एनडीआरएफच्या तीन टीमसह समुद्र किनारी पालिकेचे लाइफ गार्ड, अग्निशमन दलाचे जवान आवश्यक साधनसामग्रीसह तैनात ठेवण्यात आले आहेत.

मुंबईत आतापर्यंत आलेल्या वादळांमधील निसर्ग चक्रीवादळ हे सर्वात मोठे आणि तीव्रता जास्त असणारे आहे. सुरुवातील या चक्रीवादळाबद्दल हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र चक्रीवादळाची तिव्रता पाहता आता सर्व संबंधित यंत्रणांना ‘रेड’ अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनीही चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सावधानतेचा इशारा देत नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. दरम्यान, निर्सग वादळाच्या वार्‍यांची गती प्रतितास 95 ते 105 किमी राहणार आहे. तर नुकतेच पश्चिम बंगालमध्ये हाहाकार उडवलेल्या अम्फान वादळातील वार्‍यांची गती प्रतितास 180 किमी होती. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळ अम्फामपेक्षा कमी तिव्रतेचे अशी अपेक्षाही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हरिहरेश्वर, दमणकिनारी सर्वात आधी धडकेल

– हवामान खात्याच्या इशार्‍यानुसार मुंबईपासून 490 किमी आणि सुरतपासून 710 किमी दक्षिण-पश्चिम दिशेला चक्रीवादळाचा केंद्रबिंदू आहे. पुढील बारा तासांत हे वादळ आक्रमक होऊन ‘तुफान’ निर्माण करण्याचा धोका आहे. 3 जून रोजी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दमणमधून महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनार्‍यावर धडकेल.

– समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून सध्या या वादळची तिव्रता कमी भासत असली तरी प्रत्यक्ष हरिहरेश्वर आणि दमण येथे धडकल्यानंतर त्याची खरी तिव्रता समजेल. दरम्यान, हिंदी महासागरात निर्माण होणार्‍या चक्रीवादळांमधील 1 ते 5 च्या स्केलमध्ये निसर्ग वादळाला सध्या तरी दुसर्‍या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.

पश्चिम किनारपट्टीला धोका

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीला निसर्ग वादळाचा धोका सर्वाधिक असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यामुळे 3 व 4 जून रोजी संबंधित क्षेत्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही आहे.

1891 नंतरचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे चक्रीवादळ

हवामान खात्याच्या ‘सायक्लोन ई-एटलस’नुसार 1891 नंतर महाराष्ट्रात अरबी समुद्रात अशी तुफानी स्थिती निर्माण झाली आहे. याआधी 1948 आणि 1980 मध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र नंतर हा धोका टळला होता.

आपली प्रतिक्रिया द्या