
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दीड दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अमित शहांच्या स्वागतापासून दूर राहिले. विशेष म्हणजे, गडकरींच्या निवास्थानाशेजारीच रेडिसन ब्लू हॉटेलमध्येच शहा यांचा मुक्काम होता. असे असतानाही दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये भेट झाली नसल्याने पक्षांतर्गत कलह की आणखी काही… अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नागपूर दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांचे भाजप शहरच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. हेडगेवार चौक परिसरात भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या स्वागतसोहळ्याला भाजपच्या आजी-माजी आमदारांसह जिह्यातील भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते; मात्र या सर्वांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अनुपस्थिती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपुरात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमातही नितीन गडकरींना मोदींसमोर भाषण करू दिले नव्हते.
शहांकडून फडणवीसांचे कौतुक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल येथील ‘स्वस्ती निवास’ या निवासी इमारतीचे तसेच चिचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचे भूमिपूजन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी आणि पालकमंत्री बावनकुळे उपस्थित होते. यावेळी शहा यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले.
शहा-फडणवीस एका गाडीतून प्रवास
नागपूरमधील दोन्ही कार्यक्रमांना अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका गाडीतून प्रवास केला. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्वतंत्र गाडीतून आले. त्यामुळे शहांचे निकटवर्ती कोण, अशी चर्चाही कार्यक्रम स्थळी रंगली होती.