महाराष्ट्रात ब्राह्मण जातीला फार महत्त्व नाही! नितीन गडकरी यांचे वक्तव्य

‘‘मी ब्राह्मण आहे, पण महाराष्ट्रात ब्राह्मणांना फार महत्त्व नाही. इकडे आमची फार चालत नाही,’’ असे वक्तव्य केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

नागपूरमधील अल इब्राहिम एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘‘कोणताही व्यक्ती जात, धर्म, पंथ, भाषेने मोठा होत नाही, गुणाने मोठा असतो असे मानणाऱयांपैकी मी आहे. आम्ही मागास आहोत, मागास आहोत असे बोलणे हा अलीकडे राजकीय हितसंबंधांचा भाग झाला आहे. आता माझेच उदाहरण घ्या. मी ब्राह्मण आहे, पण इथे आमची फार चालत नाही. महाराष्ट्रात ब्राह्मणांना फार महत्त्व नाही. मात्र उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचा मोठा दबाव आहे. तिथल्या राजकारणात दुबे, पांडे, मिश्रा सगळय़ांची चलती आहे. मी एकदा यूपीमध्ये एका कार्यक्रमाला गेलो असताना सगळे माझ्याकडे आले आणि म्हणाले, पंडित अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आज आमचा कोणी दमदार नेता असेल तर तुम्ही आहात. त्यांचा रोख मी ब्राह्मण असल्याकडे होता. मी त्यांना तिथेच सुनावलं की, मी जातपात मानत नाही,’’ अशी आठवण गडकरी यांनी सांगितली. ‘‘शिक्षण ही शक्ती आहे. त्यामुळे सगळय़ा भाषांचे चांगले शिक्षण घ्यावे,’’ असा सल्लाही त्यांनी दिला.