निजामाबाद-पंढरपूर रेल्वे पुन्हा धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

शनिवार, २२ जूनपासून गाडी क्र. ५१४३४ निजामाबाद-पंढरपूर आणि गाडी क्र. ५१४३३ पंढरपूर-निजामाबाद दैनंदिन पॅसेंजर रेल्वे पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या महाव्यवस्थापकांनी दिल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. निजामाबाद-पंढरपूर रेल्वे पुन्हा पूर्ववत सुरु करा, अशा मागणीचे निवेदन १८ जून रोजी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक गजानन मल्या यांना मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या वतीने देण्यात आले होते.

दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक गजानन मल्या यांना मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या वतीने एक निवेदन देऊन सदर करुन रेल्वे तत्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा परभणी येथे रेलरोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या निवेदनाचे दखल घेऊन मल्या यांनी सदर रेल्वे पुन्हा आरंभ करण्याची आश्वासन दिले होते. यावेळी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, रितेश जैन, डॉ राजगोपाल कालानी, संभानाथ काळे, रवींद्र मूथा, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, ओंकार सिंह ठाकुर, नितीन कदम, दयानंद दीक्षित उपस्थित होते.

पंढरपूर रेल्वे पुन्हा सुरू होत असल्याने अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष मोहिते पाटील, केशवराव भरोसे, ज्ञानोबा शिंदे, अनंता पांचाळ, सौ. प्रमिला दराडे, कलावती पारवे यांनी समाधान व्यक्त केले.