
नवी मुंबई महापालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल ६ हजार ७०४ कोटी रुपयांचा फुगीर अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महापालिका सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढणार आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर २५ वर्षांपासून सुरू असलेली परंपरा खंडित करत यंदाचा अर्थसंकल्प प्रशासनाऐवजी स्थायी समितीने तयार करून तो स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी महासभेत मांडला. या अर्थसंकल्पात शहरातील वाहतूककोंडी फोडण्यावर आणि महापालिकेचा कारभार पेपरलेस करण्यावर स्थायी समितीने विशेष भर दिला आहे.
नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यापासून अर्थसंकल्प हा प्रशासनाच्या माध्यमातून तयार झाल्यानंतर तो पालिका आयुक्तांच्या माध्यमातून स्थायी समितीमध्ये सादर केला जात होता. मात्र सभागृह नेते सागर नाईक यांनी या परंपरेला छेद दिला. त्यामुळे आयुक्तांनी यंदा फक्त खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले. त्यानंतर स्थायी समितीने गोपनीय पद्धतीने अर्थसंकल्प तयार करून आज तो महासभेत मांडला. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी वस्तू व सेवा कर अनुदानापासून १ हजार ८९७ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. त्यापासून १ हजार २०० कोटी रुपये उभे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पालिकेला सर्वच महसुलातून मिळणारे उत्पन्न ४ हजार ३३७ कोटी रुपये इतके अपेक्षित असताना अर्थसंकल्प मात्र ६ हजार ७०४ कोटी रुपयांचा सादर करण्यात आला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात पालिकेचे महसुली उत्पन्न हे अडीच हजार कोटींच्या आसपास होते.
पामबिच मार्गावर उभे राहणार उड्डाणपूल
पामबिच मार्गाला नवी मुंबईचा क्विन नेकलेस म्हणून ओळखले जाते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यानंतर पामबिच मार्गावर वाहतूककोंडी होणार आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी या मार्गावर उड्डाणपूल उभा करण्याचे नियोजन स्थायी समितीने केले असून त्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांची वन टाईम प्लॅनिंग ही संकल्पना आता पुन्हा राबवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक नोडमध्ये एका सेक्टरची निवड करून या क्षेत्राचा विकास २५ ते ५० वर्षांचे नियोजन करून करण्यात येणार आहे.






























































