रूळ ओलांडताना झालेल्या अपघातात भरपाई देता येणार नाही, अपीलकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या मृत्यूनंतर रेल्वे दावा न्यायाधिकरणाने भरपाई नाकारल्यामुळे हायकोर्टात दाद मागणाऱया अपीलकर्त्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. रूळ ओलांडताना झालेली दुर्घटना ही अनुचित अथवा अनिष्ठ घटना नाही. त्यामुळे भरपाई देता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकल पीठाने अपीलकर्त्यांची मागणी फेटाळून लावली.

नालासोपारा ते भाईंदरदरम्यान प्रवास करताना एका प्रवाशाचा 5 ऑगस्ट 2006 रोजी मृत्यू झाला. रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने भरपाई मिळावी यासाठी मृत प्रवाशाची पत्नी सिंधू शिवदास यांनी रेल्वे दावा प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. पतीचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याने नुकसान भरपाईस पात्र असल्याचा दावा तिने केला होता. मात्र रेल्वे दावा प्राधिकरणाने तिची मागणी फेटाळून लावली. रेल्वे दावा प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात महिलेने हायकोर्टात अॅड. मोहन राव यांच्या मार्फत अपील दाखल केले.

न्यायालयाचे निरीक्षण काय?

घटना घडल्यावर अपघाताची परिस्थिती स्टेशन मास्तर किंवा रेल्वे पोलिसांना तत्काळ देण्यात आली नाही. त्यामुळे अपघाताची परिस्थिती संशयास्पद वाटते.

प्रवाशाला केईएम रुग्णालयात दाखल करताना नालासोपारा स्थानकाजवळ रूळ ओलांडताना मागून येणाऱया ट्रेनने धडक दिल्यामुळे जखमी झाल्याचे नोंद असून ही नोंद अधिक विश्वासार्ह मानली पाहिजे. पंचनामा करताना साक्षीदाराने सांगितले की, मृत व्यक्ती चालत्या ट्रेनमधून पडला आणि नंतर हे विधान बदलण्यात आले.