
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे जागतिक स्तरावर हिंदुस्थानची आणि हिंदुस्थानी जनतेची मोठी बदनामी होत असल्याची घणाघाती टीका केरळमचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केली आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हिंदुस्थानने आपली पारंपारिक शांततावादी ओळख पुसून टाकल्याचा आरोप केला आहे.
विजयन म्हणाले की, हिंदुस्थान हा नेहमीच जागतिक शांततेचा पुरस्कर्ता राहिला आहे आणि अन्यायकारक युद्धांच्या विरोधात आपण नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, सध्याचे केंद्र सरकार इराण आणि इस्रायल संघर्षात ज्या प्रकारे वागत आहे, त्यामुळे हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळली आहे. इस्रायलकडून होणाऱ्या आक्रमकतेचा आणि युद्धाचा स्पष्ट शब्दांत निषेध न करणे, हे केंद्र सरकारचे मोठे अपयश असल्याचे, ते म्हणाले आहेत.
पिनराई विजयन पुढे म्हणाले की, केंद्र सरकार पूर्णपणे अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण हे स्वतंत्र असायला हवे होते, परंतु सध्याचे सरकार स्वतःच्या हितासाठी देशाच्या प्रतिष्ठेला तिलांजली देत आहे. इराणवरील हल्ल्यांचा निषेध न करण्याच्या केंद्राच्या भूमिकेमुळे आशियाई देशांमध्ये हिंदुस्थानचे स्थान कमकुवत झाले आहे. या युद्धाचे परिणाम केवळ राजनैतिक नसून ते आर्थिकही आहेत, परंतु केंद्र सरकार केवळ मूक प्रेक्षक बनून हा खेळ पाहत असल्याची टीका विजयन यांनी यावेळी केली.






























































