
एसटी कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपाचा फटका स्कूलबसेसना बसला आहे. विविध जिह्यांतील शहरी भागात पहिलीपासूनच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र स्कूलबसेसना चालकच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्याचे वांदे झाले आहेत. संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱयांचे परिवहन विभागाने निलंबन केल्याने त्यांच्या जागी कंत्राटी कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सर्वाधिक भरणा हा गेल्या दीड वर्षापासून बेरोजगार असलेल्या स्कूलबस चालकांचा आहे.
राज्यातील एसटी कर्मचारी काही मागण्यांसाठी गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ संपावर आहेत. राज्य सरकारने या कर्मचाऱयांना कामावर रुजू होण्याचे आदेश देऊनही कर्मचारी परतलेले नाहीत. अखेर परिवहन विभागाने संपावर गेलेल्या कर्मचाऱयांचे निलंबन करून त्यांच्या जागी कंत्राटी पद्धतीने चालकांची नेमणूक केली आहे. या कंत्राटी कर्मचाऱयांमध्ये स्कूलबस चालकांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने स्कूलबस चालक हे बेरोजगार झाले होते. मिळेल ते काम करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. मात्र आता एसटी महामंडळाने कंत्राटी पद्धतीने चालक भरती सुरू केल्याने अनेक बसचालक महामंडळात रुजू झाले आहेत. याचदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने शाळादेखील सुरू झाल्या, मात्र चालकच नसल्याने बऱयाच जिह्यांमध्ये स्कूलबस सुरू होऊ शकलेल्या नाहीत.
खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना शाळेत पाठविण्यास संमती दिली आहे, मात्र स्कूलबसअभावी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अडचण येत आहेत. बहुसंख्य शाळांच्या स्वतःच्या स्कूलबसेस आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने दीड वर्ष या बसेस उभ्याच होत्या. त्यामुळे चालक आणि वाहकांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळली होती. यातील अनेक चालक आता एसटीत कंत्राटी पदावर रुजू झाले आहेत. त्यामुळे आम्हाला आता स्कूलबसेससाठी चालक मिळणे कठीण झाले आहे. याचा फटका पालकांना बसत आहे, अशी माहिती महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (मेस्टा) संस्थापक अध्यक्ष संजय तायडे -पाटील यांनी दिली.






























































