दोन दिवसांच्या पावसाने केली सत्ताधाऱ्यांची पोल खोल; नाले-रस्ते तुंबले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औराद शहाजानी

मागील दोन दिवसांपासुन पडत असलेल्या रिपरिप पावसाने येथील बहुतांश वार्डातील नाले तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे नालेसफाईचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ दोन दिवसांच्या आणि त्याही रिपरिप पावसाने सत्ताधाऱ्यांची पोल खोल झाली आहे.

औराद शहाजानी येथे एकुण ६ वार्ड आहेत. मोठी तालुक्याच्या लेवलची बाजारपेठ, आडत मार्केट, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वीस ते पंचवीस गावातील लोकांच्या मदतीसाठी पोलीस ठाणे आहे. म्हणून या सीमावर्ती भागातील गावाला फार मोठे महत्त्व असल्यामुळे दिवसभर दोन – तीन राज्यांचे लोक बरेचसे व्यवहार करण्यासाठी या औराद गावाला भेटी देत असतात.

येथील ग्रामपंचायतीला एक सरपंच आणि उपसरपंचासहीत एकूण १७ सदस्य आहेत. या ग्रामपंचायतीला विकास निधी म्हणून महाराष्ट्र शासनाकडून जकात अनुदान म्हणून ३० ते ३५ लाख रुपये थेट ग्रामपंचायतीला जमा होतात आणि आता तर दोन वर्षापासून महाराष्ट्र शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून ५० ते ६० लाख रुपयांचा थेट ग्रामपंचायतीला पंचवार्षीक आराखडा तयार करुन दिलेला आहे. पण अद्याप जनतेच्या मागणीनुसार शर्मा नगर, रामानुज कॉलनी, इंदीरा नगर, गणेश नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, लिंगायत गल्ली, मार्केट यार्ड, मुख्य रस्ते व बऱ्याच ठिकाणी नाले तुंबलेले आहेत तर कांही ठिकाणी नालेच गायब झालेले आहेत. कांही ठिकाणी अद्यापही नाली तयार करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आलेला निधी जातो कुठे हाच प्रश्न औराद नगरीतील लोकांना सतावतोय.

लातुरचे पालकमंत्री असलेले संभाजी पाटील निलंगेकर हे औरादमधून निवडून येऊन तीन वर्षे झाली. पण औरादकडे त्यांनी संपूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे येथील विकास खुंटला आहे. दोन राज्यांना जोडणारे दोन रस्ते पुर्णपणे खड्डेयुक्त झाल्यामुळे कर्नाटकातील लोकांना औरादला येण्यासाठी भरपूर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही वेळा जीव मुठीत धरुन यावे लागत आहे. कारण कर्नाटकातील ५ ते ६ गावांतील लोकांचे उदरनिर्वाह फक्त औरादवर अवलंबुनच आहेत.

येथील रस्ते आणि नाल्या दुरुस्त न झाल्यामुळे या दोन दिवसांच्या पावसाने चिखल आणि नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर साचल्याने सर्दी, ताप, मलेरीया अशा रोगांना बळी पडावे लागत असल्याने नागरिकांत नाराजी आहे. गेल्या ५ ते १० वर्षांपासून रस्त्याची जैसे थे अवस्था आहे. घाणीमुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. थोडीफार मंजूर कामेही निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे ती कामे जास्त कालावधी पर्यंत टिकणार नाहीत.