
माझा मागील कुठल्याही विकासकामांना, योजनांना विरोध नाही, त्यांना स्थगिती द्या अशीही माझी मागणी नाही, मात्र कुठलीही योजना ही अभ्यासपूर्वक व्हावी असे मत ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात गुरुवारी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत हे होते. छगन भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले की, नागपूरमध्ये मेट्रोचे काम अर्धवट राहिले आहे. मुंबईची मोनो रेल फेल गेली. नाशिक जिह्यातील कुठल्याही विकासकामाला मी विरोध केला नाही की स्थगितीची मागणी केलेली नाही. कुठलीही योजना ही अभ्यासपूर्वक व्हावी, आपल्याला नक्की काय हवे हे पहिले समजून घ्यावे. योजना करताना नाशिकचे नाशिकपण टिकून राहावे, सौंदर्यसुद्धा टिकले पाहिजे यादृष्टीने विचार व्हावा असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.यावेळी माजी राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांचीही भाषणे झाली.
महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य करायचेय – संजय राऊत
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकेल. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात त्यानुसार पुढील पंचवीस वर्षे हे सरकार चालेल असा विश्वास शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. देशाच्या पातळीवर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य करायचे आहे, नाशिकसारख्या जिह्यांना, शहरांनासुद्धा देशाच्या नकाशावर विकासाच्या दृष्टीने झळकवायचे आहे अशी ग्वाहीही त्यांनी दिली. हे काम सर्व मिळून एकजुटीने करायचे आहे असे ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफी, दहा रुपयांत शिवभोजन थाळी यासह या सरकारच्या योजना या राज्यातील गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱयांसाठी आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आज झाले तिचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुढील वर्षी होईल. ती जबाबदारी छगन भुजबळ यांची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.





























































