
लॉस एंजेलिसमध्ये होणाऱया 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 128 वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेत केवळ 6 पुरुष आणि 6 महिला संघांना सहभागी होता येईल, हेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड व श्रीलंका आदी मोठय़ा संघांचा पत्ता कट होण्याची शक्यता बळावली आहे.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये कोणते सहा देश खेळणार हे अद्यापि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांनी जाहीर केलेले नाही. शिवाय ऑलिम्पिक 2028 साठी पात्रतेचे निकषही स्पष्ट करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे क्रिकेटसारखा ऐतिहासिक खेळ कोणत्या 6 संघांसह ऑलिम्पिकमध्ये दिसणार, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.
ऑलिम्पिक क्रिकेट पात्रता प्रक्रिया काय असेल?
‘आयसीसी’च्या सिंगापूरमध्ये होणाऱया वार्षिक बैठकीत ऑलिम्पिकसाठी पात्रतेची अंतिम रूपरेषा तयार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटमध्येही ‘आयओसी’प्रमाणेच पाच खंडीय पात्रता पद्धती अवलंबली जाणार आहे. या प्रस्तावानुसार, आशिया, ओशिनिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका या पाच खंडांमधून प्रत्येकी एक संघ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल. या प्रक्रियेच्या आधारे सध्याच्या टी-20 क्रमवारीनुसार हिंदुस्थान (आशिया), ऑस्ट्रेलिया (ओशिनिया), ब्रिटन (युरोप), दक्षिण आफ्रिका (आफ्रिका) हे संघ आपापल्या खंडांचे प्रतिनिधित्व करतील. अमेरिका यजमान देश म्हणून थेट प्रवेश मिळवेल. सहाव्या संघासाठी वेस्ट इंडीजचे नाव समोर येत आहे, मात्र त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबवली जाईल. महिला संघांची घोषणा मात्र 2026 मध्ये होणाऱया टी-20 विश्वचषकानंतर केली जाईल. पाच खंडीय पात्रता प्रणालीद्वारे संघनिवड निश्चित झाली तर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांसारख्या संघांचा ऑलिम्पिकमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. कारण न्यूझीलंड टी-20 क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या मागे आहे, तर आशियाई देशांमध्ये हिंदुस्थान सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान यांना संधी मिळणार नाही. अहवालानुसार, न्यूझीलंड आणि पाकिस्तानने या प्रस्तावित पात्रता प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे.