
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील शाळांच्या आवारातील बेकायदा पान टपऱ्यांवर पालिका लवकरच कारवाई करणार आहे. सर्वेक्षण करून विभागवार ही कारवाई केली जाईल. आज झालेल्या शिक्षण समिती बैठकीत प्रशासनाने ही माहिती दिली.
कुर्ल्यातील एका शाळेतील शिबिराच्या वेळी अनेक मुलांनी गुटखा खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तर वडाळा परिसरात सहा मुलांनी ड्रग्स घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. घाटकोपरमध्ये चार मुले सिगारेट पिताना रंगेहाथ पकडली गेली. यात दोन मुलींचा समावेश होता, अशी माहिती नगरसेवकांनी समितीत दिली. मादक पदार्थांमुळे मुलांचे आरोग्य व भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने शाळा परिसरातील पान टपऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शुभदा गुढेकर, सईदा खान, नेहल शहा, बिंदू त्रिवेदी आदी नगरसेवकांनी केली. शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले. या वेळी सर्वेक्षण करून लवकरच कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपायुक्त नरेंद्र बर्डे यांनी दिले.


























































