
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर जिल्ह्यातील संगणक परीचालकावर मानधनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. मानधन आणि सेवेत कायम करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्र्यांनी देऊनही वर्ष लोटले तरी आश्वासनाची पूर्ती न झाल्याने टाऊन हॉल ते जिल्हा परिषद असा धडक मोर्चा काढण्यात आला.
दिपावलीचा काळ असल्याने मानधन त्वरीत खात्यावर जमा करण्यात यावे, जवळपास दीड ते दोन वर्षाचे मानधन त्वरीत देण्यात यावे, सी.एस.सी.-एस.पी. व्ही, कंपनी सरकारकडून मानधन घेते मात्र चालकांच्या खात्यावर जमा करीत नाही. त्यामुळे या कंपनीला दंड लावण्यात यावा, उत्कृष्ट दर्जाचे प्रिंटर देण्यात यावेत, सी.एस.सी.-एस.पी. व्ही, कंपनीची चौकशी करून दंड लावण्यात यावा आदी मागण्या संगणक परिचालक संघटनेने केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रलयावर मोर्चा काढू आणि सामूहिक आत्मदहन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी दिला आहे. या धडक मोर्चात राजू हाके, पवन साठे, संजय एलगट्टे, शिवशंकर सोमवंशी, गोविंद लोहे, नितेश डोळे, मंगेश् जाधव, शिवनाथ शिवाजी, लक्ष्मण मलीले यांच्यासह शेकडो परीचालक सहभागी झाले होते.






























































