
प्रसिद्ध हिंदी साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांनी दारूच्या दुकानाचे अतिशय उत्कट वर्णन केले आहे. दारूच्या दुकानाला ते ‘मधुशाला’ म्हणतात.
सुन कलकल, छलछल मधुघट से गिरती प्यालों में हाला
सुन, रुनझुन रुनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
बस आ पहुंचे, दूर नहीं कुछ, चार कदम अब चलना है
चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले मधुशाला।
मधुघटातून चषकात मद्य ओतताना होणारी मंदमधुर कलकल ऐकण्यासाठी आतुर झालेल्या मद्यपीची मधुशालाही तेवढ्याच धुंद नजरेने वाट पाहते। मद्यपी आणि मधुशाला यांच्या नात्याची ही गुंफण… पण नेमके याच्या उलट चित्र असेल तर..? नांदेड जिल्ह्याच्या नायगावात देशी दारूची अकरा दुकाने आहेत… पण काय अवस्था… बसायला जागा नाही, पाणी विकत घ्यावे लागते। स्वच्छतागृह तर दूरच… मद्य रिचवणारांची अशी परवड न पाहवल्याने अखेर स्थानिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साकडे घातले आहे. आता जिल्हाधिकारी या मधुशालेला केव्हा भेट देतात, याकडे नायगावकरांचे लक्ष लागले आहे.
नायगाव तालुक्यात देशी दारूची ११ दुकाने आहेत, देशी दारूचे भिंगरी, संत्रा, टँगो पंच, हुर्राक असे बँड, पण नायगावात जास्त आवडीने रिचवली जाते ती भिंगरी. त्या खालोखाल संत्रा. दिवसभराचा शीण हलका करण्यासाठी या मधुशालेत जावे तर तिथे ना बसायला जागा, ना स्वच्छता। काही अस्सल पिणारे नवटाक एका दमात रिचवतात, त्यासाठी वर्षानुवर्षाचा सराव लागतो. काही जणांना पाणी टाकून आहिस्ता आहिस्ता घेणे पसंत असते. पण कोणत्याही दुकानात अशी व्यवस्था नाही. शेवटी उभ्यानेच त्याला रिचवावी लागते। बरं हे ठीक, पण पाणी विकत घ्यावे लागते.. ही केवढी नाइन्साफी।
लोकस्वराज्य आंदोलनाचे रावसाहेब पवार, गणपत रेड्डी यांना नायगावातील दारूच्या दुकानांची आणि पिणाऱ्यांची परवड पाहवली नाही. त्यांनी थेट जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे धाव घेत देशी दारूच्या सर्व दुकानांमध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी, बसण्यासाठी टेबल, खुर्चा, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. खरे तर दारू दुकानांच्या बाबतीत उत्पादन शुल्क विभागाकडे दाद मागायला हवी. पण नांदेडचे जिल्हाधिकारी कर्तबगार असल्यामुळे आपल्या मागण्यांना लवकर न्याय मिळेल असे वाटल्याने या कार्यकर्त्यांनी दारू दुकानांच्या असुविधांचा पाढा वाचणारा अहवालच निवेदनासोबत जोडला आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे कसा न्याय देतात, याकडे नायगावकरांचे लक्ष लागले आहे.































































