दिंडोशीमध्ये गणेशदर्शनातून पोहचवला प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आणि सरकारने प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्राचे आवाहन केल्यानंतर विविध माध्यमांद्वारे जनजागृती करून ‘प्लॅस्टिकचा वापर टाळा, कापडी पिशव्या वापरा’ असा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्याचे काम युवासेना, शिवसेना आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू झाले व नागरिकांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गणेशोत्सवानिमित्त दिंडोशी विधानसभेत विभागप्रमुख-आमदार  सुनील प्रभू यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेले प्लॅस्टिकमुक्तीचे आवाहन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याच्या दृष्टीने एक अनोखी संकल्पना राबविली. संकल्पनेप्रमाणे गणपती पूजा साहित्य, प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश लिहिलेले आरती संग्रह पुस्तक व धनुष्यबाणाचे चिन्ह असलेली कापडी पिशवी घेऊन शिवसेना कार्यकर्त्यांनी दिंडोशी विधांसभेमधील दीड, पाच, सात आणि अकरा दिवसांचा सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक कुटुंबीयांच्या घरी व गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात जाऊन प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देत प्लॅस्टिकचा वापर टाळा असे आवाहन गणरायासमोर केले व भेटवस्तू दिल्या. अशा पद्धतीने दिंडोशीमध्ये ‘प्लॅस्टिकचा वापर टाळा व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’ असा संदेश गणेशदर्शनातून घराघरात पोहोचविला.

प्लॅस्टिक पर्यावरणाचा ऱहास करणारे असून प्लॅस्टिकमुक्तीमधून पर्यावरणाचा होणार ऱहास थांबेल, यासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळा ही संकल्पना शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुढे आणली. घटनात्मकदृष्टय़ा सरकारची परवानगी मिळवली आणि समाजाच्या हितार्थ जनजागृतीमधून विविध माध्यमांना आणि सामाजिक संस्थांना प्लॅस्टिकबंदीसाठी सहकार्य करा असे आवाहन देखील केले.