
सामना प्रतिनिधी । जालना
हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करूनही यावर्षी वरुणराजाने फारशी हजेरी लावली नाही. अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांमध्ये साठा न झाल्याने पावसाळ्यातच टंचाईची दाहकता अनुभवावी लागत आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी दोघांची पातळी जोत्याखाली, तर एक प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर तर झालाच, परंतु येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावणार आहे.
जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघु प्रकल्प आहेत. यावर्षी पाऊस न पडल्यामुळे ऑक्टोबरमध्ये विदारक स्थिती आहे. जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्प आणि भोकरदन तालुक्यातील धामना प्रकल्पाची पातळी जोत्याखाली गेली आहे. भोकरदन शहराच्या पाणीपुरवठ्याची मदार असलेले जुई धरण तर कोरडेच पडले आहे. उर्वरित प्रकल्पांमध्येही जेमतेम साठा उपलब्ध आहे. जालना तालुक्यातील कल्याण गिरीजामध्ये ०.७५ दलघमी साठा असून, त्याची टक्केवारी ७.७६ टक्के आहे. बदनापूर अप्पर दुधना प्रकल्पात १.०९ दलघमी साठा असून, त्याची टक्केवारी ९ टक्के एवढी आहे.
जाफराबाद : जिवरेखा धरणात २.३९ दलघमी साठा असून, त्याची टक्केवारी ३८.९९ टक्के एवढी आहे. अंबडच्या गल्हाटी प्रकल्पात १.४५ दलघमी साठा असून, त्याची टक्केवारी १०.४८ टक्के एवढी आहे. जिल्ह्यातील सातही तलावांमध्ये एकूण ५.६८ दलघमी साठा असून, त्याची टक्केवारी ८.२९ टक्के एवढी आहे.






























































