
जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. वैद्यकशास्त्रातील यंदाचे नोबेल मेरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि डॉ. शिमोन साकागुची यांना जाहीर झाले आहे. बाह्य रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित संशोधनासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. तब्बल 10 कोटी रुपयांचा हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात येईल.
नोबेल विजेत्यापैकी ब्रुंको या अमेरिकेच्या सिएटलमधील इन्स्टिट्यूट फॉर सिस्टम्स बायोलॉजीमध्ये वरिष्ठ पदावर आहेत, तर रॅम्सडेल हे सॅन फ्रान्सिस्कोमधील सोनोमा बायोथेरप्यूटिक्सचे वैज्ञानिक सल्लागार आहेत, तर साकागुची हे जपानच्या ओसाका विद्यापीठातील इम्युनॉलॉजी फ्रंटियर रिसर्च सेंटरमध्ये वरिष्ठ प्राध्यापक आहेत. शरीर रोगप्रतिकारक शक्ती कशी नियंत्रणात ठेवते हे समजून घेण्याचा नवीन मार्ग या तिघांनी शोधला आहे. मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र, गुरुवारी साहित्य, शुक्रवारी शांततेचे नोबेल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर 13 ऑक्टोबरला अर्थशास्त्रातील नोबेलची घोषणा होईल.