
जयेंद्र लोंढे,[email protected]
वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई क्रीडा स्पर्धा या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करीत हिंदुस्थानचा झेंडा रुबाबात फडकवणाऱया कोल्हापूरच्या राही सरनोबतला नुकतेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अर्जुन पुरस्कारानंतर जबाबदारी वाढली
अर्जुन हा देशातील मानाचा पुरस्कार. देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळावा हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळे माझ्यासाठीही हा पुरस्कार मोलाचा आहे. आता आगामी काळातील सर्व स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन व ऊर्जा मिळाली आहे. मात्र माझ्या खांद्यावरील जबाबदारी वाढलीय हेही तेवढेच महत्त्वाचे, असे राही यावेळी म्हणाली.
दुखापत अन् ब्रेक
2014 साली मे महिन्यात दुखापत झाली. तरीही कॉमनवेल्थ व आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये मी सहभागी झाले. तसेच पदकही मिळवले. 2016 सालातील रिओ ऑलिम्पिकसाठी सज्ज होत असतानाच ही दुखापत बळावली. दुखापतीच्या पार्श्वभूमीवर मला ब्रेक घ्यायचा नव्हता. कारण ब्रेक घेतला तर आपण बॅकफूटवर फेकले जातो. तसेच ऑलिम्पिकसारखी क्रीडा स्पर्धा ही चार वर्षांनंतर एकदा येते. ही संधी घालवायची नव्हती. पण दुखापतीचा त्रास वाढतच गेला. त्यामुळे अखेर विश्रांती घ्यावीच लागली, असे राहीने यावेळी नमूद केले.
फिजिओथेरेपीने बरी झाली
मला नेमबाजीने दुखापत झाली नव्हती. पडल्यामुळे हाताचा कोपर दुखावला होता. त्यासाठी शस्त्रक्रिया हा पर्याय होता. पण त्यामुळे माझी नेमबाजीतील कारकीर्द धोक्यात आली असती. शस्त्रक्रियेने सर्वसामान्यांना काही फरक पडत नाही, पण नेमबाजीतील खेळाडूंवर याचा विपरीत परिणाम होत असतो. सूक्ष्म गोष्टींचा फरकही यावेळी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे फिजिओथेरेपीला पसंती दिली. कोपरामध्ये दोन इंजेक्शन घ्यावी लागली. मी बरी झाली, असे राहीने आवर्जून सांगितले.
पुरस्कार विजेते खेळाडू कोल्हापूरमध्ये घडतात
माझा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. यासाठी स्वतःला नशीबवान समजते. कोल्हापूरमध्ये पुरस्कार विजेते खेळाडू घडतात. अर्जुन पुरस्कार जिंकणारी मी कोल्हापूरची पाचवी खेळाडू. क्रीडामय वातावरणात लहानाची मोठी झालीय. खाशाबा जाधव, गणपतराव आंदळकर या महान खेळाडूंकडून प्रेरणा मिळाली, असे भावुक उद्गार तिने यावेळी काढले.
परदेशी प्रशिक्षक अन् कोटीच्या वर खर्च
मला ऑलिम्पियन प्रशिक्षकाची गरज होती. यासाठी मी जर्मनीच्या मुंखबयार दोरसुरेनची निवड केली. तिलाही युवा खेळाडूला मार्गदर्शन करायचे नव्हते. माझ्याकडे अनुभव होता. तिने थोडा वेळ घेत मला मार्गदर्शन करायला होकार सांगितला. पण यासाठी तिला प्रत्येक महिन्याला चार लाख वीस हजार रुपये द्यावे लागतात. तीन वर्षांचा करार असल्यामुळे ही रक्कम एक कोटींच्या वर जाते. याशिवाय पुण्यात मला सराव करावा लागतो. यासाठी तिला येथे बोलवावे लागते. तसेच मी स्पर्धांमध्ये विविध ठिकाणी खेळायला जाते तेव्हाही तिला घेऊन जावे लागते. त्यामुळे हा खर्च आणखी वाढतो. पण नेमबाजीत खूप पुढे जायचे आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. यासाठीच मेहनत घेत आहे, असे स्पष्ट मत राहीने यावेळी व्यक्त केले.
अडचणी आहेत पण…
नेमबाजी हा खर्चिक खेळ आहे हे मान्य आहे. यामध्ये करीअर करणाऱयांसाठी एक सल्ला देईन… यामध्ये संयम अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच कोणत्याही गोष्टींसाठी सरकार आणि संघटनेला दोष देणे चुकीचे आहे. सरकारकडून प्रत्येक स्पर्धागणिक खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात येत आहे. तसेच क्लास वनच्या नोकरीसाठीही खेळाडूंचा विचार करण्यात येत आहे. बालेवाडीत नेमबाजांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. अर्थात काही अडचणी आहेत. राज्यांतील छोटय़ा छोटय़ा शहरांमध्ये शूटिंग रेज नाही. आदी बाबींच्या त्रुटी आहेत, पण टप्प्याटप्प्याने प्रगती होईल, असे राहीला वाटते.






















































