
संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज शनिवारी झालेल्या छाननीमध्ये बाद ठरविण्यात आला. गुन्ह्याचा कॉलम रिक्त सोडल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे रमेश गायकवाड यांनी सांगितले.
पश्चिम विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात आला. या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस पक्षाने दोन दिवसांपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीच्या डेमोक्रेटिक गटाचे जि. प. सदस्य रमेश गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याचबरोबर अपक्ष म्हणूनही अर्ज भरला होता. उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये गायकवाड यांनी अर्जातील गुन्हाचा कॉलम रिक्त सोडल्यामुळे त्यांचा काँग्रेस पक्षासह अपक्ष उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. या संदर्भात रमेश गायकवाड म्हणाले माझ्यावर कोणताच गुन्हा दाखल नाही. त्यामुळे तो कॉलम तसाच रिक्त सोडला. परंतु त्या कॉलममध्ये खूण करणे आवश्यक असल्याचे सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद ठरवला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड यांचा अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
मध्य मतदारसंघातील चार उमेदवारांचे अर्ज बाद; 23 उमेदवारांचे अर्ज वैध
संभाजीनगर मध्य विधानसभा मतदार संघासाठी 27 उमेदवारांचे 39 अर्ज प्राप्त झाले होते. शनिवारी झालेल्या छाननीमध्ये चार उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 23 उमेदवार राहिले आहेत.
मध्य विधानसभा मतदार संघातून 27 उमेदवारांचे 39 अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची छाननी शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानोबा बाणापूरे यांनी केली. यामध्ये अपक्ष उमेदवार भानुदास भालेराव, स्वतंत्र भारत पक्षाचे शेख रशीद, अखिल भारतीय हिंदू महासभेचे अक्षय पाटील, अपक्ष सतीष पाटील या चार उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. या उमेदवारांच्या अर्जामध्ये प्रस्तावकाची संख्या अपुरी ठेवण्यात आली होती. उमेदवारी अर्जामध्ये दहा प्रस्तावक असणे आवश्यक आहे. हे प्रस्तावक त्याच मतदार संघातील मतदार असावेत. ज्या मतदारसंघातून ते उमेदवारी अर्ज भरत आहेत. मात्र पूर्व व पश्चिम मतदार संघातील मतदारांची नावे प्रस्तावक म्हणून दिली होती. तर एका उमेदवाराने 10 ऐवजी आठच प्रस्तावकाची नावे टाकली होती. त्यामुळे हे चारही अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले. 23 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर आहे. त्या दिवशी दुपारी 3 वाजेनंतर मतदार संघातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण मतदारसंघातील उमेदवार संजय वाकचौरे यांचा एबी फॉर्म अवैध ठरवण्यात आला आहे.




























































