राणेंना धक्का: अपक्ष उमेदवार दत्ता सामंत निवडणूक रिंगणातून आऊट

2521

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पहिला मोठा धक्का बसला आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उतरविलेल्या राणे समर्थक तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त उर्फ दत्ता सामंत विधानसभा निवडणुक रिंगणातून आधीच आऊट झाले आहेत. सामंत यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी अर्ज छाननी वेळी हरकत घेतली होती. त्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी सुनावणीअंती सामंत यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज अवैध ठरविले. हा नारायण राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे. यातच शिवसेनेचा विजय पक्का झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात आनंद तर स्वाभिमानच्या गोटात कमालीची शांतता पसरली आहे.

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून दहा उमेदवारांनी एकूण पंधरा अर्ज दाखल केले होते. शनिवारी येथील प्रांत कार्यालयात या अर्जांची  छाननी प्रक्रीया पार पडली. यावेळी शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांनी अपक्ष उमेदवार तथा राणे समर्थक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. आ.नाईक यांच्या कायदेशीर सल्लागारांनी सामंत हे शासकीय ठेकेदार असल्याचे पुरावेच निवडणुक निर्णय अधिका-यांसमोर सादर केले. त्यानंतर सामंत यांच्याही कायदेशीर सल्लागारांनी सामंत यांची बाजू मांडली. त्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दोन तासांची मुदत दिली. त्यानंतर दुपारी याबाबत सुनावणी झाली. यावेळी सायंकाळी 6 वा.निकाल देण्यात येईल असे निवडणुक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. दुपारी व सायंकाळी दोनवेळा सुनावणी झाली. सायंकाळी सहा वाजता निवडणुक निर्णय अधिकारी यांनी निकाल देत लोकप्रतिनिधी अधिनियम 1951, भाग 2, कलम 9(अ) नुसार दत्ता सामंत यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचे घोषित केले. सामंत यांनी एक अपक्ष व एक भाजपाच्या नावावर असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र दोन्ही अर्ज आता अवैध ठरल्याने नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचे घोषित करताना दत्ता सामंत, रणजित देसाई, दिनेश साळगांवकर आदी प्रांताधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. दत्ता सामंत यांचे अर्ज अवैध ठरताच स्वाभिमानच्या गोटात कमालीची शांतता पसरली होती. दरम्यान प्रांताधिकारी कार्यालय परिसरात कडेकोड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शिवसेनेने दिला मोठा धक्का

नारायण राणे यांनी कुडाळ विधानसभा मतदारसंघात दत्ता सामंत यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले होते.मात्र शिवसेनेने त्यांना निवडणुकीपूर्वीच धक्का दिला आहे. दत्ता सामंत यांनी लागलीच पत्रकार परिषद घेत आपण शासकीय अधिकृत ठेकेदार नाही मात्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार काम करीत असल्याची सारवासारव केली.

आ.वैभव नाईक यांचा अर्ज वैध

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यासह दहा अर्ज शनिवारी झालेल्या छाननीत वैध ठरले आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारिख सोमवार दि.7 ऑक्टोबर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या