
रेशन दुकानांवर आता स्वस्त दरात चिकन, मच्छी, मटण आणि अंडी मिळणार आहेत. देशातील पोषण सुरक्षेचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकार ही योजना राबवणार आहे. सध्या निती आयोग यावर काम करीत आहे. पुढील वर्षी 1 एप्रिलपासून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे गोरगरीबांना रेशनवर स्वस्त दरात प्रोटिनयुक्त खाद्यपदार्थ खरेदी करता येणार आहेत.
रेशन दुकानांवर सध्या गहू, तांदूळ, साखर तसेच कडधान्ये दिली जातात. याबरोबरीनेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्रोटीनयुक्त पदार्थ उपलब्ध करून देण्याबाबत निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी काम करीत आहेत. या पदार्थांच्या यादीत चिकन, मच्छी, मटण आणि अंडी यांचा समावेश केला जाणार आहे. सुरुवातीला किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ उपलब्ध केले जाणार आहेत. अन्न सुरक्षा विधेयक आणखी मजबूत करण्याचा सरकारचा विचार आहे.
निती आयोगाचे व्हिजन डॉक्युमेंट
कुपोषण आणि ऑनिमिया यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी पुढील 15 वर्षांसाठी व्हिजन डॉक्युमेंट बनवले जाणार आहे. देशातील बहुसंख्य नागरिक तेलकट, मसालेदार आणि अतिगोड पदार्थ खातात. ते आरोग्याला घातक आहेत. त्या पार्श्वभूमीवर जनतेला प्रोटीनयुक्त पदार्थांबाबत जागरूक करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी स्पष्ट केले.

























































