
उत्तर गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 4 पर्यटकांसह क्लबच्या 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतर 7 जणांची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी क्लबचे दोन मालक, मॅनेजर व आयोजक अशा चौघांना अटक केली आहे.
पणजीपासून 25 किलोमीटरवर असलेल्या आरपोरा येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या क्लबमध्ये ही दुर्घटना घडली. क्लबच्या छतापासून आगीचा भडका उडाला. काही क्षणातच आग पसरली. धोक्याचा अंदाज येताच पर्यटकांची बाहेर पडण्यासाठी झुंबड उडाली, मात्र किचनमध्ये असलेले कर्मचारी तिथेच अडकले. आग किचनपर्यंत गेल्याने सिलिंडरचा स्पह्ट झाला आणि हाहाकार उडाला. काही लोकांचा होरपळून तर बहुतेकांचा गुदमरून मृत्यू झाला. आगीत संपूर्ण क्लबचा कोळसा झाला.
आजपासून फायर सेफ्टी ऑडिट
कलंगुटमधील सर्व क्लबचे आजपासून फायर सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे. योग्य परवाना नसलेल्या व सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नसलेल्या क्लबचे परवाने रद्द केले जातील, असे कलंगुटचे आमदार मायकेल लोबो यांनी सांगितले.
क्लबचे बांधकाम बेकायदा
या क्लबचे बांधकाम बेकायदा होते. कोणत्याही वैध परवानगीशिवाय ते करण्यात आले होते. अतिक्रमणविरोधी विभागाने त्यास नोटीसही बजावली होती. मात्र उच्चपदस्थांनी त्या नोटिसीला स्थगिती दिली होती, असा दावा स्थानिक गावकऱ्यांनी केला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्यानंतरही क्लब चालवण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त केला आहे.
पायरो गनमुळे लागली आग; काँग्रेसचा आरोप
क्लबमधील आगीच्या घटनेनंतर काँग्रेसने गोव्यातील व पेंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढवला. कोणीही या, कायदे मोडा आणि बिझनेस करा अशी खुली सूट दोन्ही सरकारांनी गोव्यात दिली आहे. त्यातून हे सगळे घडत आहे. सिलिंडर स्पह्टामुळे ही आग लागली असे आता सांगत आहेत, पण खरे कारण आतषबाजीसाठी वापरली जाणारी ‘पायरो गन’ आहे. या गनमुळे ठिणगी पडली, नंतर सिलिंडर स्पह्ट झाला आणि आग भडकली, असा आरोप काँग्रेसचे खासदार पॅप्टन विरिटो फर्नांडिस यांनी केला.
मेहबुबा गाण्याची झिंग… पार्टी रंगात असतानाच भडका
आग लागली तेव्हा क्लबमध्ये बेली डान्स सुरू होता. ‘शोले’तील ‘मेहबुबा, मेहबुबा…’ हे गाणे सुरू होते. मद्याचे पेले हातात घेऊन लोक नाचगाण्यात बेधुंद झाले होते. त्याचवेळी छताला आग लागली. बघता बघता ही आग पसरली. संपूर्ण क्लबमध्ये धुराचे साम्राज्य पसरले. या प्रसंगाचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.


























































