
कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढणाऱ्या आणि काही दिवसांपूर्वी ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या उत्तर मुंबईतून आता कोरोना हद्दपार व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये दहिसर-कांदिवलीचा डबलिंग रेट 85 दिवस झाला असून बोरिवली नव्वद दिवसांपार गेली आहे. तर मालाड आणि गोरेगावमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी 107 दिवसांवर गेल्याने चांगलाच दिलासा मिळाला आहे. यामध्ये रुग्णवाढीची सरासरीही दिवसेंदिवस कमी होत असून सद्यस्थितीत 0.78 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱया प्रयत्नांमुळे सुरुवातील दक्षिण मुंबईत वेगाने वाढणारा कोरोना आटोक्यात आला. मात्र याच वेळी गोरेगावपासून दहिसरपर्यंत संपूर्ण उत्तर मुंबईत कोरोनाची वाढ झपाटय़ाने होऊ लागली. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाडमध्ये तर डबलिंग रेट 45 दिवसांपर्यंत खाली आला. यामुळे पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मुंबईच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन झिरो’ अभियान आणि सद्यस्थितीत प्रभावीपणे राबवण्यात येणाऱया ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत घरोघरी सर्वेक्षण, तपासणी, जनजागृती आणि प्रभावी उपाययोजना यामुळे उत्तर मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी झपाटय़ाने वाढत आहे. दहिसर, बोरिवली, कांदिवलीत झोन-7चे उपआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या नियोजनात कोरोना रोखण्यासाठी काम करण्यात येत आहे.
मुंबईचा एकूण डबलिंग 120 दिवसांवर
सद्यस्थिती संपूर्ण मुंबईत कोरोना आटोक्यात येत असल्याने डबलिंग रेट झपाटय़ाने वाढत आहे. यामध्ये मुंबईत 4 ऑक्टोबर रोजी 64 दिवस असणारा डबलिंग रेट 24 ऑक्टोबरपर्यंत 120 दिवसांवर गेला आहे.
यामध्ये सर्वाधिक वाढ एफ-दक्षिण म्हणजेच परळ, बी विभाग सँडहर्स्ट रोड येथील डबलिंग रेट सर्वाधिक म्हणजेच अनुक्रमे 219 आणि 206 दिवसांवर पोहोचला आहे. तर जी-साऊथ वरळी – 187 दिवस, ए कुलाबा – 173 दिवस, ई भायखळा-157 दिवस आणि जी उत्तर दादरमध्ये डबलिंग रेट 152 दिवसांवर पोहोचला आहे.
दसऱयाच्या शुभमुहूर्तावर शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार मुंबईतील एका रुग्णालयात डॉक्टरांनीदेखील हा मुहूर्त साधून आपल्या वैद्यकीय साहित्य, मास्क, वेटिंलेटरची पूजा करीत रविवारी शस्त्रपूजन साजरा केले.
अशी होतेय सुधारणा
ऑक्टोबरच्या सुरुवातील आर-मध्य म्हणजेच बोरिवलीत रुग्ण दुपटीचा कालावधी 47 दिवस होता. यामध्ये मोठी सुधारणा झाली असून आता डबलिंग रेट 86 दिवस झाला आहे. तर सरासरी वाढ 1.50 टक्के होती. ती आता 0.78 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
महिन्याच्या सुरुवातीला आर-दक्षिण म्हणजेच कांदिवलीत रुग्ण दुपटीचा कालावधी 55 दिवस होता. तो आता 84 दिवस झाला आहे. तर रुग्णवाढीची सरासरी 1.28 टक्के होती. 0.82 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
आर-उत्तर म्हणजेच दहिसरमध्ये महिन्याच्या सुरुवातील रुग्ण दुपटीचा कालावधी 60 दिवस होता तो आता 83 दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्णवाढीची सरासरी 1.16 टक्के होती. ती आता 0.84 टक्के झाली आहे.
























































