रेल्वे बोर्डाने मुंबईकरांना गर्दीत ढकलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।  मुंबई

मुंबईत लोकलने प्रवास करताना घरातून बाहेर पडलेला माणूस हातीपायी धडधाकट घरी येईल की नाही याची कोणतीही शाश्वती नसताना रेल्वेने मात्र मुंबईकरांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. उपनगरीय लोकल प्रवासात दररोज सरासरी दहा प्रवाशांचा मृत्यू होत असताना मुंबई भेटीवर आलेल्या रेल्वे बोर्ड अध्यक्षांनी मुंबईसाठी स्वतंत्र झोन करण्याची काहीही आवश्यकता नसून रेल्वे बोर्ड सक्षम असल्याचे म्हटले आहे.

उपनगरात प्रवाशांची वाढलेली प्रचंड संख्या आणि लोकलचे अपुरे नियोजन यामुळे दररोज गाडीतून लटकता प्रवास करणे प्रवाशांच्या नशिबी असते. उपनगरीय मार्गावर साडेतीन हजार प्रवाशांचा दरवर्षी मृत्यू होत आहे. तसेच गाडीतून पडून मृत्युमुखी पडणाऱ्या नोकरदार महिलांचे प्रमाणही प्रचंड वाढले असताना मुंबई भेटीवर आलेल्या रेल्वे बोर्ड अध्यक्ष लोहाणी यांनी केवळ दिखावे वाटणाऱ्या प्रकल्पांचे नारळ फोडून अगदी फोटोसेशन टाईप लोकार्पण केले.

बुलेट ट्रेन हा प्रकल्प देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून हे तंत्रज्ञान ही काळाचीच गरज असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दिवा ते ठाणे तसेच कुर्ला ते परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प दोनमधील प्रचंड रखडलेले काम पूर्ण करण्यावर भर असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा, पश्चिम रेल्वेचे महाक्यकस्थापक ए.के. गुप्ता, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन आदींसह सर्व ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई भेटीवर आलेल्या रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विविध प्रवासी सुविधांची पाहणी केली. यावेळी यूटीएस मोबाईल ऍपचे सादरीकरण त्यांच्यासमोर करण्यात आले. याप्रसंगी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन आदी.