
मुंबईहून अहमदाबादला जाण्याच्या तयारीत असतानाच इंडिगोच्या विमानात ‘डेंजर’ असं लिहिलेली चिठ्ठी सापडली. यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच खळबळ उडाली. चिठ्ठी सापडताच बॉम्बस्फोटाची भीती व्यक्त करत तात्काळ आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्नीशमन दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे विमान बुधवारी मुंबईहून अहमदाबादला चालले होते. विमान गेट क्रमांक 5 जवळ असताना सफाई कर्मचाऱ्यांना शौचालयात एक टीश्यू पेपर आढळला. या पेपरवर डेंजर असे लिहिले होते. यानंतर सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली. तात्काळ विमानात शोधमोहिम राबवण्यात आली. यामुळे विमानतळ परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विमानाची कसून झडती घेतली. तपासात विमानात कोणतीही संशयास्पद किंवा घातक वस्तू आढळली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
































































