
मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक बब्रुवान रुद्रकंठावार ऊर्फ धनंजय चिंचोलीकर यांचे आज रविवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या 61व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील प्रतापनगर स्मशानभूमीत रविवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
मराठवाडी ग्रामीण बोलीतील अस्सलपणा, उपरोधिक विनोद आणि सामाजिक-राजकीय वास्तवावरची निर्भीड मांडणी ही बब्रुवान रुद्रकंठावार यांच्या लेखनाची वैशिष्टय़े होती. ‘पुन्यांदा चबढब’, ‘टऱर्या, डिंग्या आन् गळे’, ‘आमादमी विदाऊट पार्टी’, ‘न घेतलेल्या मुलाखती’ यांसारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली. व्यवसायाने पत्रकार असलेल्या बब्रुवान यांनी दीर्घकाळ वृत्तपत्रातून सदरलेखन केले.



























































