
सर्बियाचा स्टार खेळाडू व जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या नोवाक जोकोविचने इंग्लंडच्या डॅन इव्हन्सचा सरळ सेटमध्ये पराभव करत विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत धडक दिली. दुसरीकडे महिला एकेरीत रशियाच्या मिरा अॅण्ड्रीवा हिनेही विजयासह आगेकूच केली.
सात वेळच्या विम्बल्डन विजेत्या सहाव्या मानांकित नोवाक जोकोविचने पुन्हा एकदा हिरवळीच्या कोर्टवरील आपली बादशाही सिद्ध करताना दुसऱया फेरीत ब्रिटिश वाईल्डकार्ड खेळाडू डॅनियल इव्हन्सचा 6-3, 6-2, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ही लढत जोकोविचसाठी उट्टे काढणारी होती. कारण 2021 मध्ये मोंटे कार्लोतील मातीच्या कोर्टवर जोकोविच हा इव्हन्सकडून पराभूत झाला होता. इव्हन्स हा हिरवळीच्या कोर्टवरही चांगला खेळाडू आहे. त्यामुळे ही लढत माझ्यासाठी सोपी नसेल, असे जोकोविचने लढतीपूर्वी म्हटले होते. मात्र, प्रत्यक्ष लढतीत जोकोविचने आपल्या लौकिकास जागत इव्हन्सचा धुव्वा उडविला. महिला एकेरीत सातव्या मानांकित रशियाच्या मिरा अॅण्ड्रीवा हिने इटलीच्या लुसिया ब्रोंझेटी हिचा 6-1, 7-6 (7/4) असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. अॅण्ड्रीवाने ही दुसऱया फेरीतील लढत 1 तास 33 मिनिटांत जिंकली. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर अॅण्ड्रीवाला दुसरा सेट जिंकण्यासाठी घाम गाळावा लागला. लुसियाने हा सेट टायब्रेकपर्यंत नेला होता. मात्र, यात बाजी मारण्यात अपयशी ठरली.