
सुट्या पैशांची कटकट कमी करण्यासाठी आणि डिजिटल तिकिटाला चालना देण्यासाठी बेस्टने काढलेल्या ‘चलो अॅप’ला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता बेस्ट बसची अचूक वेळ समजण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला जाणार आहे. बस कुठपर्यंत आली, बस थांब्यावर येण्यास किती वेळ आहे, कुठल्या बसला बस थांब्यावर येण्यास उशीर होईल याची अपडेट माहिती आता प्रवाशांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. गुगल मॅपवर बेस्ट बसची माहिती प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यात आज झालेल्या सामंजस्य करारानुसार, मुंबईकरांना बेस्टची अचूक सेवा घेता येणार आहे. या सेवेमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक बळकट होणार असून या सेवेचा बेस्टलादेखील फायदा होणार आहे. बस प्रवाशांना बस मिळण्याबाबतची अनिश्चितता यामुळे दूर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक एस.व्ही.आर. श्रीनिवास आणि गुगल मॅप्सच्या रोली अग्रवाल यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.