वंदे भारत एक्प्रेसनंतर रेल्वे प्रवाशांना आता सर्वात वेगवान बुलेट ट्रेनचे वेध लागले आहेत. रेल्वे मंत्रालयाने चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीला (आयसीएफ) वंदे भारत बुलेट ट्रेन बनवण्याची जबाबदारी सोपवलीय. ही बुलेट ट्रेन ताशी 220 ते 250 किलोमीटर वेगाने धावणार आहे.
सध्या देशातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ओळखली जाते. या एक्सप्रेसचा वेग 180 किलोमीटर प्रतितास इतका आहे. रेल्वे मंत्रालयाने काही आठवडय़ांपूर्वीच चेन्नईच्या आयसीएफवर या आर्थिक वर्षात दोन वंदे भारत बुलेट ट्रेन बनवण्याची जबाबदारी सोपवलीय. वंदे भारत बुलेट ट्रेनच्या निर्मितीसाठी जपानी रोलिंग स्टॉक पुरवठादार हिताची आणि कावासाकी या कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. 2018 मध्ये 10 डब्यांची बुलेट ट्रेन तयार करण्यासाठी सुमारे 389 कोटी रुपये खर्च येत होता. परंतु, 2023 मध्ये हा खर्च वाढून 460 कोटी रुपयांवर पोहोचला.
वंदे भारत एक्सप्रेस बनवताना जे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आयसीएफ नवीन हाय–स्पीड बुलेट ट्रेन बनवणार आहे. या नवीन गाडय़ांना 8 डबे असतील आणि त्यांच्या निर्मितीचे काम लवकरच चेन्नईच्या कारखान्यात सुरू होणार आहे.