‘एनआरसी’मुळे अकाली दल भाजपवर नाराज,दिल्ली विधानसभा निवडणुकीत आघाडी तोडली

495

शिरोमणी अकाली दलाने नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (सीएए) स्वागत केले आहे. मात्र यातून एका धर्माच्या लोकांना बाहेर ठेवणे चुकीचे आहे. त्याचबरोबर देशात ‘एनआरसी’ लागू करण्यात येऊ नये, अशी आपल्या पक्षाची भूमिका असल्याचे अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी स्पष्ट केले आहे. याच मुद्दय़ावर भाजपसोबत आघाडी करून दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्यासही त्यांनी नकार दिला आहे.

सीएएपासून मुसलमानांना वेगळे ठेवता येऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका अकाली दलाने घेतली आहे. त्यानंतरही सीएए आणि एनआरसी संदर्भातील भूमिका बदलण्यात यावी यासाठी भाजपकडून प्रचंड दबाव येत आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजप नेत्यांसोबत आतापर्यंत तीन बैठका झाल्या. यात सीएए व एनआरसीबाबतची भूमिका बदलण्याचाच आग्रह धरण्यात आला. हे अकाली दलाला मान्य नाही. त्यामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मनजिंदर सिंह सिरसा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जेडीयू, लोक जनशक्ती पार्टी भाजपसोबत

दिल्लीत भाजपचा सर्वात जुना मित्र असणारा अकाली दल हा पक्ष सीएए आणि एनआरसीच्या मुद्दय़ावरून नाराज होऊन दुरावला आहे. त्यामुळे भाजपने जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पार्टीला जवळ केले आहे. संगम विहार आणि बुराडी या दोन मतदारसंघांतून जेडीयू तर सीमापुरी येथून लोक जनशक्ती पार्टीचा उमेदवार लढणार आहे.

सीएएविरोधात दिल्लीत विद्यार्थ्यांची निदर्शने

राजधानी दिल्ली येथील मंडी हाऊस भागात वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्या विरोधात सोमवारी घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. यात विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला होता. त्यामुळे मंडी हाऊस ते जंतर मंतर मैदानापर्यंत निदर्शकांचा थवा जमा झाला होता. या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते संदीप दीक्षित हेदेखील मंडी हाऊस येथे पोहोचले होते. निदर्शक विद्यार्थ्यांमध्ये जेएनयू छात्र संघ, जामिया आणि एआयएसए या विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. केंद्र सरकारने सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे कायदे परत घ्यावेत ही या संतप्त विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांचा जमाव वाढत असल्याचे पाहून दिल्ली पोलिसांनी सुरक्षिततेची सर्व व्यवस्था तैनात ठेवली होती. मंडी हाऊस आणि त्याच्या आसपास सीआरपीएफचे जवान तैनात ठेवण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या