ठसा – डॉ. श्याम त्रिंबक टिळक

453

प्रख्यात शास्त्रज्ञ, लेखक व भारतीय वायुजीवशास्त्रज्ञ सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्याम त्रिंबक टिळक यांचे नुकतेच निधन झाले. स्वदेशी बनावट यंत्रनिर्मिती आणि अविरत संशोधनकार्य त्यांनी केले. असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉ. टिळक यांनी ‘वायुजीवशास्त्र’ या नव्याने विकसित वैज्ञानिक शाखेचा आयुष्यभर प्रसार व प्रचार केला.

1990 साली संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन अविरत संशोधनकार्य त्यांनी केले. 1995 ते 1998 या कालावधीमध्ये भारती विद्यापीठात प्रकल्प संचालक म्हणून कार्य केले. डॉ. श्याम टिळक यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. 1972 मध्ये ‘टिळक एअर सॅम्पलर’ या स्वदेशी बनावट यंत्रनिर्मितीसाठी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते. विविध विद्यापीठामध्ये ‘वायुजीवशास्त्र संशोधन केंद्राची’ त्यांनी निर्मिती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 80 विद्यार्थ्यांनी पी.एचडी. प्राप्त केली आहे. त्यांची वायुजीवशास्त्राची 11 पुस्तके व 250 शोधनिबंध प्रकाशित झाली आहेत. मराठी भाषेत दहा ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. ‘मागोवा मानवी जीवन शैलीचा’ व  Aerobiology International Edition. ही दोन पुस्तके प्रकाशित होत आहेत. बोधगया विद्यापीठाने त्यांना Father of Indian Aerobiology ही डी.लिट. देण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या