
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सवुमनसोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
X वर एक पोस्ट करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे.”
ते पुढे म्हणाले की, “जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी.”
शासकीय निवासस्थानाचा दुरुपयोग, नरहरी झिरवळांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल



























































