
प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा छंद असतो. कुणाला पोस्टाची तिकीटे जमवण्याचा तर कुणाला जुनी नाणी गोळा करण्याचा. ओडिशा येथे राहणारी तिसरीतील विद्यार्थिनी दिव्यांशी हीदेखील आपल्या अनोख्या छंदामुळे चर्चेत आली आहे. तिला चक्क वेगवेगळ्या देशांतील आगपेटय़ा जमवण्याची आवड आहे. सध्या तिच्या संग्रहात नेपाळ, भूतान, बांग्लादेश आदी देशांमधील तब्बल 5 हजार आगपेटय़ा आहेत. ट्रव्हल, फ्लॉवर, ट्रान्सपोर्ट अशा वेगवेगळ्या थीमनुसार तिने आगपेटय़ा एका फोल्डरमध्ये ऑर्गनाईज केल्या आहेत. खरंतर दिव्यांशीला हा छंद जोपासण्यासाठी तिच्या वडिलांनी प्रेरणा दिली. ते वाईल्ड फोटोग्राफर असल्याने वेगवेगळ्या देशांत त्यांची भटकंती होते. तिथून परतताना ते आगपेटय़ा घेऊन यायचे. या आगपेटय़ांचे डिझाईन दिव्यांशीला आवडू लागले. तिने त्या आगपेटय़ा सांभाळून ठेवायला सुरुवात केली. बघता बघता आज तिच्याकडे आगपेटय़ांचा मोठा संग्रह तयार झाला आहे


























































