
ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील केसपूर गावात सध्या चिंतेचे वातावरण आहे. अँग्लो-ईस्टर्न शिप मॅनेजमेंटच्या ‘ईए जर्सी’ या जहाजावर कार्यरत असलेले मर्चंट नेव्ही कॅडेट सार्थक महापात्रा समुद्रात रहस्यमयरित्या बेपत्ता झाले आहेत. ही घटना घडली तेव्हा ते जहाज पश्चिम आफ्रिकेहून सिंगापूरच्या दिशेने प्रवास करत होते. सार्थक यांच्या अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून त्यांनी या घटनेवर संशय व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक यांनी 2 फेब्रुवारी रोजी त्यांच्या आईशी, रस्मिता महापात्रा यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला होता. त्यावेळच्या संभाषणात ते पूर्णपणे तंदुरुस्त आणि आनंदी दिसत होते. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनीटांनी वाजता आपल्या केबिनच्या दिशेने जाताना दिसले, मात्र सकाळी साडेआठच्या सुमारास जहाजाच्या मुख्य अधिकाऱ्याने तपासणी केली असता ते केबिनमध्ये नव्हते. या घटनेनंतर तातडीने जहाजाचा वेग कमी करून संपूर्ण जहाजावर आणि आसपासच्या समुद्रात शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही.
या प्रकरणाची माहिती मॉरिशस मेरीटाईम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरला (MRCC) देण्यात आली असून समुद्रात व्यापक शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. सार्थक हे त्यांची इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात होते आणि अवघ्या दोन महिन्यांत त्यांना ‘थर्ड ऑफिसर’ म्हणून बढती मिळणार होती. अशा परिस्थितीत त्यांच्या बेपत्ता होण्यामागे काहीतरी संशयास्पद असल्याचा दावा त्यांच्या आईने केला असून त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत ओडिशा सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. राज्य सरकारने परराष्ट्र मंत्रालय, जहाजबांधणी महासंचालक आणि संबंधित केंद्रीय मंत्रालयांशी संपर्क साधून शोध मोहीम अधिक वेगवान करण्याची विनंती केली आहे. सार्थक महापात्रा यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, ते सुखरूप परत यावेत यासाठी त्यांचे कुटुंबीय प्रार्थना करत आहेत.


























































