
निरोप समारंभात मैत्रीचे गीत गायले म्हणून तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, पण मुख्यमंत्री तसेच मंत्रीही सार्वजनिक कार्याक्रमातून जनतेशी संवाद साधताना गायन कलेचा प्रभावी वापर करतात. अन्य प्रशासकीय कारवाईऐवजी थेट निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नांदेडमधील उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांची लातूरच्या रेणापूरचे तहसीलदार म्हणून बदली झाली. तेव्हा उमरी तहसील कार्यालयातील सहकाऱयांनी निरोप समारंभ आयोजित केला होता. या निरोप समारंभात मनोगत व्यक्त करीत असताना तहसीलदार प्रशांत थोरात यांनी तहसील कार्यालयातील खुर्चीवर बसून तेरे जैसा यार कहाँ हे गाण गायलं. त्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात प्रशांत थोरात यांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्यामुळे शासकीय कर्मचाऱयांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून प्रशांत थोरात यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची विनंती केली आहे.
मंत्रालय ‘टेकवारी’च्या माध्यमातून तणावमुक्तीसह कार्यालयीन सुव्यवस्थेबद्दलची जी मार्गदर्शक व्याख्याने झाली होती त्यावेळी राज्य व पेंद्र शासनाच्या कर्मयोगी प्रणालीद्वारे कामकाज करताना तणावमुक्ततेबाबत सुचवलेल्या उपाययोजनांकडे राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.
कारवाई अन्यायकारक
कौटुंबिक वातावरणात होत असलेल्या आपुलकीच्या व भावुक निरोपप्रसंगी तहसीलदार प्रशांत थोरात यांनी मैत्रीचे गुणगान करणारे गीत गायले, पण हे गात असताना त्यांचे हावभाव आक्षेपार्ह होते, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. इतर प्रशासकीय कारवाईचा पर्याय न अवलंबता थेट तडकाफडकी निलंबनाची केलेली कारवाई अन्यायकारक वाटते असे महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.