ओला कार चालकाचा झोल, एकाची कार दुसऱ्याला परस्पर विकून पैसे हडपले

123

सामना प्रतिनिधी, मुंबई

महावितरणमध्ये इंजिनीअर असल्याचे सांगायचे, पण प्रत्यक्षात ओला, उबेरच्या गाडय़ा चालवायच्या आणि संधी मिळून नागरिकांची फसवणूक करायची. अशी बनवेगिरी करणाऱया एका कार चालकाला शिवाजी पार्प पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. एकाची कार दुसऱयाला परस्पर विकून लाखो रुपयांचा झोल त्याने केला होता.

लक्ष्मण कदम (34) असे त्या भामटय़ाचे नाव आहे. मूळचा बीडचा असलेला लक्ष्मण ठाण्यात राहतो आणि मुंबईत ओला, उबेरच्या गाडय़ा चालवतो. गाडय़ा चालवताना लक्ष्मण प्रवाशांच्या ओळखी काढतो. मग शक्य होईल तशी त्यांची फसवणूक करतो. अशीच त्याची विष्णू परब यांच्याशी ओळख झाली होती. परब यांना एक गाडी खरेदी करायची होती. तेव्हा लक्ष्मणने मध्यस्थी करीत ओएलएक्सवर हाताळकर यांनी त्यांची गाडी विक्रीसाठी ठेवली असून चांगली कार असल्याचे लक्ष्मणने परब यांना सुचवले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून परब यांनी अडीच लाखांत हाताळकर यांची कार खरेदी केली. ती कार आणि कागदपत्र लक्ष्मणने आपल्या ताब्यात घेतले आणि ओलाला ती कार चालवतो आणि तुम्हाला पैसे देतो असे त्याने परब यांना सांगितले. त्यानुसार परब तयार झाले. मग लक्ष्मणने पुन्हा गाडीच्या दुरुस्तीसाठी सवा दोन लाख रुपये घेतले आणि कार पुण्यातील एका ओळखीच्या व्यक्तीला 90 हजारांत विकली.

तीन महिने झाले तरी कार न पाहिल्याने परब यांनी कार बघण्यासाठी घेऊन येण्यास त्याला सांगितले. तेव्हा लक्ष्मणने मोबाईल बंद केला आणि तो पसार झाला. फसवणूक झाल्याचे कळताच परब यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र उतेकर, एपीआय पंढरीनाथ कांदे, तसेच उत्तम महाडिक, संदीप शेलार, ज्ञानेश्वर केकाण, महेंद्र बावीस्कर आणि विनोद पाटील या पथकाने ठाण्यात सापळा रचून लक्ष्मणला पकडले.

आपली प्रतिक्रिया द्या